भारतीय संस्कृतीत माणसाच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ उद्देश धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांची प्राप्ती हा सांगितला आहे. हे चारही पुरुषार्थ प्राप्त करण्याचे साधन म्हणजे माणसाचे आरोग्य होय ! शरीर व्याधीग्रस्त असेल तर माणूस धर्माचे पालन करु शकत नाही. हवे तितके धनही मिळवू शकत नाही. काम सुखाचा आनंद घेणेही त्याला अशक्य बनू शकते. मोक्षाचा विषय तर लांबच राहिला. शरीर स्वास्थ आणि मनाचाही जवळचा संबंध असतो. म्हणूनच तर म्हटले आहे, " शरीर धड तर मन धड "
निरोगी भिकारी हा रोगी कोट्यधिशापेक्षा सुखी असतो. म्हणून जीवनाचे खरे सार म्हणजे आरोग्य ! म्हणूनच आयुर्वेदाचा मूळ उद्देश निरोगी माणसाच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि नंतर दुसरा उद्देश रोग्यांच्या व्याधीचे निवारण करणे असा आहे.
पण हल्लीच्या जीवनशैलीत सुखासाठीच्या धडपडीत लोकांना स्वास्थ आणि आरोग्य या विषयी फारशी आस्था राहिलेली नाही. त्यामुळे आजारी पडले की डॉक्टरांकडे धावायचे. पटकन बरे वाटेल असे औषध घ्यायचे आणि पुन्हा शरीराला कामाला जुंपायचे असा प्रकार सुरु असतो. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता आणि जीवनशक्तीवर विपरित परिणाम होत असतो.
आपल्याकडे सध्या चार उपचारपध्दती प्रचलित आहेत.
१. अँलोपँथी २. आयुर्वेद ३. होमिओपँथी. ४. निसर्गोपचार
आणखीनही काही उपचार पध्दती आहेत. पण, त्या आपल्याकडे फारशा नाहीत.
यातील अँलोपँथी या उपचार पध्दतीचा सगळ्यांनाच परिचय आहे. आधुनिक वैद्यक शास्त्र असे याला जरी म्हणत असले तरी त्याला अनेक मर्यादा आहेत. मुळातच ही उपचार पध्दती लक्षणाधिष्टीत आहे. त्यामुळे इथे लक्षणानुसार औषध योजना केली जात असल्याने प्रत्येक लक्षणाला वेगळे औषध दिले जाते. त्यामुळे रुग्णाला औषधांची उसळ खावी लागते. इतके करुनही औषध लक्षणावर असल्याने रुग्णाला लक्षण कमी झाले की बरे झाल्यासारखे वाटते. नंतर काही काळाने आजार त्याच अथवा दुस-या रुपात डोके वर काढतो.
या उपचार पध्दतीत वापरली जाणारी औषधे ही रसायने असतात. त्यांच्या प्रभावाने लक्षणे लगेच कमी होतातही, पण त्याचे दुष्परिणामही तिततकेच असल्याने रुग्णाला ती त्रासदायक ठरतात. एका आजाराची लक्षणे कमी होतानाच नवीन व्याधीची बीजे पेरली जातात.त्यामुळे रोग्याला आयुष्यभर कसल्या ना कसल्या व्याधींचा सामना करतच जगावे लागते. काही व्याधीत रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी तात्काळ उपाय म्हणून ही उपचार पध्दती फायद्याची आणि आवश्यक नक्कीच आहे, पण मनुष्याला आरोग्यदायी जीवन ती देऊ शकत नाही.
त्यासाठी स्थल, काल, प्रकृती, आहार, विहार, निसर्ग आणि विकृती या सगळ्यांचा साकल्याने विचार करावा लागतो. त्यानुसार लक्षणांचा विचार करुन रोगाच्या मुळाशी आणि रुग्णाच्या मनाशी पोहोचावे लागते. लक्षण म्हणजे रोगाच्या अस्तित्वाबाबत शरीराने दिलेला इशारा आहे. ते सूत्र पकडून रोगाच्या मुळाशी पोहोचून तिथे उपचार केले तर रोगी व्याधीमुक्त होतो, हा विचार अँलोपँथीपेक्षा आयुर्वेदात अधिक सूत्रबध्द आणि प्रभावीपणे केला आहे.
सध्या लोकप्रिय असलेल्या अँलोपँथीच्या मर्यादा आणि आरोग्याबाबत सूक्ष्म विचार करण्याची आयुर्वेदाची पध्दत याचा थोडक्यात आढावा आपण घेतला. आता ख-या आरोग्याची ओळख करुन घेवू.
लठ्ठ आणि दिसायला भक्कम असलेले शरीर म्हणजे आरोग्य असा अनेकांचा समज आहे. ज्यांच्या शरीरीत कसलेही जंतू नाहीत तो निरोगी असाही काहीजणांचा समज आहे. पण, या दोन्हीतही पूर्ण आरोग्याचा परिचय नाही.
ज्याच्या शरीरात वात म्हणजे स्नायू मंडल, पित्त म्हणजे पाचकाग्नी आणि रक्त संवहन, कफ म्हणजे ओज अथवा जीवनशक्ती आणि मलोत्सर्ग हे निश्चित अवस्थेत, बरोबर आणि एकसमान आहेत व यथायोग्य काम करत आहेत. असाच मनुष्य पूर्ण स्वस्थ आहे, असे आयुर्वेदाने सांगितले आहे.
आयुर्वेदाने आत्मा आणि मन यांचाही विचार केला आहे. आरोग्याचा विचार करता मनाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे पूर्ण स्वास्थ्यात शरीराबरोबरच मनाचे स्वास्थ्यही गरजेचे आहे. शरीराने स्वस्थ दिसणारा मनुष्य मनाने प्रसन्न नसेल तर त्याला स्वस्थ कसे म्हणता येईल ?
त्यामुळे शारीरिक आरोग्याचा विचार करण्याआधी आपल्याला मानसिक आरोग्याबाबत चिंतन करावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment